रहस्यमई गूढ दशमहाविद्या

दशमहाविद्या – या नावातच सामावलेली आहे अपरंपार तांत्रिक रहस्यांची शक्तिपुंजं. "महाविद्या" म्हणजेच "महान विद्या", आणि "दश" म्हणजे दहा. या दहा तांत्रिक शक्ती म्हणजे स्वयं आदिशक्तीचे – परमेश्वरी ज्ञान, काळ, सृजन, संहार, मोह, वैराग्य, योग, मृत्यू, कल्याण अशा सर्व शक्तींचे विविध रूपे. या देवींची पूजा ही सामान्य भक्तीमार्ग नाही. ह्या कोणत्या भाविकांच्या 'आईच्या' किंवा 'हळव्या' भावना समजून घेणाऱ्या नाहीत. त्या क्रूर, कठोर आणि अतिशय शिस्तबद्ध आहेत. जशा नियमात पूजा झाली तर त्या कृपाही करतात, पण जर नियम मोडले, तर नाश अटळ आहे.

या महाविद्या आहेत: काली, तारा, षोडशी (त्रिपुरसुंदरी), भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या सर्वांचे मूळ स्वरूप वेगवेगळे असले, तरी त्यांचा मार्ग एकच – तंत्र. आणि तंत्र म्हणजे केवळ पूजाच नव्हे, तर एक अखंड साधना, जेथे नियम, निष्कलंकता, संयम, उपासनेचे सातत्य, वेळ, दिशा, भाव, आचार-विचार, शरीराची व मानसिक शुद्धता. या सगळ्यांचे काटेकोर पालन अनिवार्य आहे.

परंतु आजच्या काळात, विशेषतः गृहस्थ लोकांमध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. तो म्हणजे “देव काही आपल्या चुका बघून माफ करत असतो”, “आईला मनापासून हाक मारली की ती धावते”, “आई रागवत नाही”, “आई सगळं समजून घेते” – हो, हे आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, कुटुंबातील परम स्नेहशील देवींबाबत योग्यही ठरू शकते. पण ‘दशमहाविद्या’ या त्या आई नव्हेत. त्या देवी आहेत, पण त्यांच्या ठिकाणी आईपणाचा ओलसर गोडवा फारसा नाही. त्यांचं आईपण म्हणजे तत्त्वज्ञान, शक्ती, निर्णय, संहार, आणि परत नव्याने निर्माण करणे.

या महाविद्यांच्या उपासनेत जर तुम्ही वेळ पाळला नाही, प्रायश्चित्त घेतलं नाही, यंत्रपूजा अर्धवट केली, प्राणप्रतिष्ठित मूर्तीला वेळेवर नैवेद्य, आवाहन, विसर्जन दिलं नाही, तर त्या शक्तीचा राग सौम्य नसतो. अनेक वेळा लोकांना वाटतं “माझ्या घरात कालीची मूर्ती आहे, मी तिला रोज फुल वाहतो, नमस्कार करतो. ती माझी आई आहे. ती रागावेल का माझ्यावर?” पण सत्य हे आहे की, तुमचं भाव कितीही प्रामाणिक असलं, तरी त्या देवी भावावर नव्हे तर विधीवर चालतात. विधी झाला, तर कृपा; विधी मोडला, तर नाश.

कालीची उपासना केली जाते मृत्युपर्यंतचा भय सोसण्यासाठी;

तारा – ज्याचे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं धाडस आहे त्याच्यासाठी;

षोडशी – राजस सौंदर्याच्या, त्रैलोक्य मोहाच्या अनुभवासाठी, जी ब्रह्मचर्य पाळणाऱ्या साधकासाठी आहे;

भैरवी – जी साधकाला पूर्णतः आपल्याच चर्म, रक्त, अस्थी, विकारातून पार उतरवते;

छिन्नमस्ता – जिची मूर्तीच स्वतःचे डोके कापलेली आहे आणि तरीही रक्त तीनजणींना पाजते;

धूमावती – विधवा, अस्थिरता आणि संपूर्ण वैराग्याची देवी;

बगलामुखी – शत्रुनाशासाठी वापरली जाणारी, पण ज्यात जर अंहकार आला, तर उलट स्वतःचाच नाश; मातंगी – पूर्णतः अपवित्र वाटणाऱ्या गोष्टींमधून दिव्यता शोधणारी;

आणि कमला – लक्ष्मीचे अत्यंत तांत्रिक रूप.

गृहस्थ व्यक्ती ह्या देवींची पूजा का करू नये?

कारण पहिलं म्हणजे – गृहस्थ जीवनच अशा तांत्रिक साधनेसाठी अडथळा आहे. सकाळी उठून ऑफिस, मुलांचं शाळेचं काम, घरची धावपळ, पती-पत्नीचं एकमेकांवर अवलंबून असणं, अनियमित जेवणं, कामाचा ताण, आणि मनात भिन्न भावनांची भरती-ओहोटी. यातून कोण घरात ठरलेली दिशा, ठरलेली वेळ, ठरलेलं आचरण, स्त्री-पुरुष स्पर्शवर्ज्यता, तांत्रिक ब्रह्मचर्य, मंत्रोपासनेतील अचूक उच्चार, नैमित्तिक पूजा, अन्ननियम, मौन, आणि तपश्चर्या याचे पालन करणार?

दुसरं म्हणजे – दशमहाविद्यांमधील काही देवींचे स्वरूप आणि उपासना ह्या अशा गोष्टी वापरतात ज्या सामान्य संस्कृतीत “अपवित्र” मानल्या जातात – जसं की छिन्नमस्ता साधनेत रक्त, धूमावती उपासनेत विधवा भोजन, मातंगी साधनेत अन्नाचं उष्टं, मृतदेहाजवळ पूजा, रात्रभर स्मशानात बसून साधना, इत्यादी. हे सर्व गोष्टी सामन्य गृहस्थ व्यक्तींच्या जीवनाशी आणि मानसिकतेशी पूर्णपणे विसंगत आहेत.

तीसरा मुद्दा – या देवी कुलदेवीसारख्या "माझ्या बाळाला मी माफ करीन", असं म्हणणाऱ्या नाहीत. उलट त्या फॉर्मूल्यासारख्या आहेत – 1 + 1 = 2. जसा चुकीचा नंबर डायल केला तर कॉल दुसऱ्यालाच लागतो, तसा चुकीचा विधी केला, अर्धवट केला, किंवा नियम न पाळता पूजा केली तर लाभ सोडाच, पण नुकसान निश्चितच. काही वेळा तर त्या देवींची शक्ती उलटून साधकावर परिणाम करत असते – घरात अघोरी घटक तयार होणे, मानसिक अस्थिरता, रात्रंदिवस स्वप्नात भीतीदायक दृश्ये, आर्थिक नुकसान, घरात अपघात, अचानक मृत्यू, घरात वाद, रोग, मुलांमध्ये चिडचिड, पती-पत्नीमध्ये वितुष्ट – हे सर्व अनुभव अनेक तथाकथित 'भाविक' किंवा 'स्वघोषित साधक' अनुभवल्याचे उघडपणे सांगितले गेले आहे.

लोक आज देवींच्या मूळ स्वरूपाकडे न बघता, सोशल मिडियावर एकमेकांचे व्हिडीओ बघून “माझं मन ओढलं जातं कालीकडे”, “तारामातेचा चेहरा खूप शांत वाटतो”, “छिन्नमस्तेच्या मूर्तीपुढे बसल्यावर खूप काही विचित्र अनुभवलं” – अशा भावनांवर आधारित अर्धवट श्रद्धा घेऊन या शक्तींकडे वळतात. पण भावनांवर देवी कृपा करत नाहीत. त्या तपावर, सच्च्या शुद्ध आचरणावर, आणि मंत्रसिद्ध साधनेवर कृपा करतात.

खरंतर या देवींचा मार्ग म्हणजे “नाश करून निर्माण” करणारा. तुझं संपूर्ण जुना स्वभाव, अहंकार, वासना, भीती, मोह, आसक्ती, राग – हे सर्व त्या आधी नष्ट करतात, त्यावर उलटतात, त्याला चिरडतात. त्यानंतरच त्या शक्ती प्रसन्न होतात.

म्हणून सामान्य गृहस्थाने या उपासनेकडे केवळ “आई” म्हणून बघू नये. त्या देवी आहेत – पण त्या आई नव्हेत, जशा आपणास वाटतात. त्यांच्या कृपेसाठी नियम हाच धर्म आहे.

गृहस्थाने आपली श्रद्धा आणि पूजाअर्चा आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, पारंपरिक देवतांमध्ये ठेवावी. त्या देवी भाव ग्रहण करतात, क्षमा करतात, वासनेतूनही भक्ती शोधतात, आणि खऱ्या अर्थाने “आई” असतात. पण दशमहाविद्या – त्या शक्ती आहेत. त्या प्रचंड, प्रखर, प्रखरापलीकडच्या... आणि त्यांच्याशी खेळ करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळ.

शेवटी, उपासना हवीच – पण ती आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या जीवनशैलीशी सुसंगत, आणि आपल्या संस्कारांशी एकरूप असली पाहिजे. श्रद्धेचा अर्थ अंधत्व नव्हे.ज्ञानपूर्वक मार्ग, नियमबद्ध साधना, आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय दशमहाविद्यांच्या दिशेने पाऊल टाकणं – हे दिव्य नव्हे, ते धोकादायक आहे.

तेव्हा पूजेला भाव देताना, देवतेच्या स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान आणि शिस्त हाच खरा श्रद्धेचा मार्ग आहे. अशा शिस्तबद्ध मार्गासाठीच दशमहाविद्या आहेत – ज्यांना पूजणं म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या धमन्यांमध्ये अग्निशुद्धी घालणं. त्या कृपा करतात, पण भावावर नव्हे – नियमांवर.

अशाच अजून गूढ आणि रहस्यमयी माहितीसाठी आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

अप्सरा, यक्षिणी आणि योगिनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनेक जण विचारतात की अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी किंवा अशा सूक्ष्म जगातील शक्तींची साधना करता येते का. पुस्तके वाचून, यूट्यूबवरील व्हिडि...