आज एक खूप महत्त्वाचा विषय तुमच्याशी बोलते आहे. कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता, विश्वास ठेवता…
पण काही वेळा अति श्रद्धेने, अति कुतूहलाने, चुकीच्या मार्गावर चालायला लागता… म्हणून आज मी स्पष्ट, अगदी ठाम शब्दांत सांगते कुलदेवी कोण? दशमहाविद्या कोण? आणि यात नेमकं काय अंतर आहे, ते समजून घ्या.
कोण असते कुलदेवी?
कुलदेवी म्हणजे आपल्या रक्तात, वंशात, परंपरेत खोलवर स्थिर झालेली, आपल्या जन्मोजन्मींच्या पूर्वजांनी उपासलेली, साक्षात आपल्या घरट्याची, आपल्या घराची, आपल्या अस्तित्वाची रक्षणकर्ती. कुलदेवी म्हणजे वात्सल्याचं, करुणेचं, रक्षणाचं, आशीर्वादाचं रूप. ती आईसारखी असते शांत, नितळ, सत्वगुणी. ती तुम्हाला मागे ठेवत नाही, ती पुढे नेत असते. ती तुम्हाला स्वप्नं देते, पण त्याचबरोबर त्यासाठी शुद्ध परिश्रमाची आणि योग्य मर्यादेची शिकवणही देते. आपल्या घरात आजी, आई, काकू, मावश्या, सगळ्यांनी एखाद्या देवीला नमस्कार करताना पाहिलं असेल, ती आपली कुलदेवी असते. तिच्या समोर दिवा लावला जातो, एक साधं पान सुपारी ठेवून नमस्कार केला जातो, आणि तरी तिचा परिणाम फार मोठा असतो. हीच देवी तुमच्या आयुष्यात जे जे अडथळे येतात, त्यांचं मूल कारण दूर करते. अंधश्रद्धा नाही, ही शक्ती आहे. श्रद्धा असेल, तर तिच्या छोट्याशा दर्शनातही तुमचं आयुष्य पालटू शकतं.
आता ह्याच्या विरुद्ध आहे दशमहाविद्या
दशमहाविद्या म्हणजे शक्तीच्या दहा महान आणि अत्यंत उग्र रूपांचा समूह. त्या आहेत — काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या प्रत्येक महाविद्या म्हणजे प्रत्येकीचा एक स्वतंत्र तांत्रिक मार्ग. यात सत्व नाही, यातील बहुतेक शक्ती राजस आणि तामस गुणांनी युक्त आहेत. त्या सृष्टीची रचना, विध्वंस, स्थिती आणि पुनर्निर्मिती करणाऱ्या आहेत. त्या म्हणजे तंत्रविद्येची परमसीमा.
मग तुम्ही विचाराल, माई, मग ह्या पूज्य आहेत का?
हो, त्या पूज्य आहेत… पण सर्वांसाठी नाहीत. महाविदयांच उग्र तत्त्व असतं, ते साक्षात शक्तीचं आदिम, अनावर रूप आहे. याला साधण्यासाठी एक अत्यंत कठीण, संयमित आणि तपश्चर्यायुक्त जीवन असावं लागतं. यासाठी ‘गुरु’ हवा पण कोणताही गुरु नाही, तर तंत्रसिद्ध गुरु. म्हणजे ज्याने स्वतः एक तरी महाविद्या सिद्ध केलेली असावी लागते.
पण आजच्या काळात सोशल मीडिया, यूट्युब, काही बोगस ग्रंथ विकणारे लोक, आणि ‘तांत्रिक’ नावाखाली स्वतःचं अघोरी आणि असामर्थ्याचं प्रदर्शन करणारे लोक यामुळे लोकांना वाटायला लागलंय की ही तंत्र साधना सर्वांसाठी खुले आहे. कुणीही कुठूनही ‘कुंजिका स्तोत्र’, ‘बगलामुखी स्तोत्र’, ‘काली मंत्र’, ‘भैरवी यंत्र’ करायला लागतात. बघा, ही फार मोठी चूक आहे.
ज्यांना गुरुदीक्षा नाही, जे गृहस्थ आहेत, ज्यांना कुठलाही योग्य तांत्रिक मार्गदर्शक नाही, त्यांच्यासाठी ही तंत्रमार्गाची पूजा अत्यंत हानिकारक आहे.
कारण तंत्रमार्गामध्ये अत्यंत गुप्त नियम असतात. हे यंत्र, मंत्र, स्तोत्र यांचे स्वतःचे जाग्रत क्षेत्र असते. त्या मंत्रांचं कंपन तुम्हाला वर नेऊ शकतं, पण ते तुमचं मन, देह, जीवन पूर्ण तयार नसेल तर तुम्हाला खाली फेकूनही देऊ शकतं. काही मंत्रांमध्ये त्यागाची, अपरिग्रहाची, एकांतिकतेची अपेक्षा असते. घरात संसार, मुलं, जबाबदाऱ्या असताना त्या साधना तुमच्यावर उलट परिणाम करू शकतात.
जसं काही औषधं डॉक्टरशिवाय घेतली, तर बऱं न होता अजून वाईट होतं, तसंच हे आहे. तंत्र हा आयुर्वेदासारखा आहे. योग्य निदान, योग्य संकल्प, योग्य गुरु, आणि योग्य सिद्धी. नाहीतर साधक वेडा होतो, शरीरात ताप चढतो, मनावर परिणाम होतो, आणि मग एकटेपणा, डिप्रेशन, भयानक स्वप्नं, चिडचिड, आर्थिक नुकसान, अपयश, आजार, कर्जं हे सगळं वाढतं.
तुम्ही म्हणाल पण माई, मंत्र तर देवीचा आहे… तो वाईट कसा होईल?
जसं अग्नि आहे, तो स्वयंपाकात वापरला तर पोषण करतो, पण अंगावर पडला तर जाळतो… तसंच मंत्राचं असतं. मंत्र हे ‘सजीव’ असतात. ते ओढतात… पण तुमच्या जीवनातील नकारात्मकता, असंतुलन, आणि विशेषतः अहंकार असेल तर ते त्याचं भक्ष करतात. तेव्हा हे लक्षात ठेवा तांत्रिक पूजा सर्वांसाठी नसते. ती केवळ सिद्ध गुरुच्या मार्गदर्शनातच होते. आणि ती साधना कुणीही घेत नसतो. ती देवी स्वतः तिचा योग्य साधक शोधून त्याला तिच्या साधना करवून घेते.
त्यामुळे, तुमच्यासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात प्रभावी आहे ती आपली कुलदेवीची उपासना.
कुलदेवी म्हणजे कोणताही तांत्रिक गुंता नाही, कोणतंही जोखमीचं साधन नाही. पण तरीही ती साक्षात जागृत असते. कारण आपल्या पूर्वजांनी ती जागवलेली असते. ती तुम्हाला आधीपासूनच ओळखते. तुम्ही तिच्यासाठी नवीन नाही, तिच्यासाठी परकं नाही. म्हणूनच कुलदेवीची एक साधी पूजा, एक जप, एक आर्त विनंती देखील तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.
तुम्ही दर सोमवारी, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या यासारख्या दिवशी तिच्या नावाचा जप करा अगदी साध्या पद्धतीने. ओवाळा, दिवा लावा, तिला सांगितलं, "माझ्यावर लक्ष ठेव, आई…" एवढं पुरेसं आहे. कुलदेवी घर सांभाळते, नातं सांभाळते, पोट भरते, संकट टळवते, घरातले वाद शमवते, मूल जन्माला येण्यासाठी मार्ग करते… ही सगळीच ‘तांत्रिक’ कामं ती करत असते, पण एका सत्वगुणी, आपुलकीच्या मार्गानं.
तुमची कुलदेवी जागृत झाली, की बाकी कोणत्याही महाविद्येची गरज पडत नाही.
आणखी एक गोष्ट. मी काही वेळा पाहिलंय की ‘कुंजिका स्तोत्र’ म्हणायला सुरुवात केली की लोक म्हणतात "माझ्या घरात भांडणं वाढली." कारण ते स्तोत्र हनुमानाच्या, चंडीच्या आणि तांत्रिक भागाचे संमीलन आहे. हे नुसतं वाचायचं नसतं, त्यामागे विशिष्ट अधिकार, गुरूचं संरक्षण आणि सात्विक आचरण लागतं.
म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते गृहस्थ म्हणून, मुलाबाळांसह, संसार करत असाल…गुरुदीक्षा घेतलेली नसेल…तांत्रिक मार्ग समजलेला नसेल…तर कृपा करून अशा मंत्र, स्तोत्र, यंत्र, पूजांच्या वाटेला जाऊ नका. जगदंबा काही तुमच्यावर रागावत नाही. उलट ती म्हणते "बाळ, तू साध्या मनानं माझं नाव घे… मी तुला सगळं देईन."
ती तुम्हाला हव्या त्या गोष्टी देईल, पण तुमची परीक्षा घेणार नाही. दशमहाविद्या मात्र देण्याआधी तुमची प्रत्येक परीक्षा घेते. ती तुमच्या मनांची इच्छा पूर्ण करेल पण त्या आधी तुमच्या देहातून, मनातून, इंद्रियातून, सहनशक्तीतून तुम्हाला अगदी मरणासन्न करून सोडेल, वैरागी भाव आनेल, नाते संबंधी सगळे दूर होतील, जग नको नकोस वाटेल…तेव्हा तुम्हाला पाहिजे ते मिळेल कारण तिच्यासाठी तुम्ही हे सर्व सोडल्यानंतर, एकाकी झाल्यानंतर तिच्यासाठी पात्र बनता, आता तुम्हाला काय हवंय ते तुम्हीच ठरवा.
काही गोष्टी आहेत ज्या फक्त पाहण्यासाठी असतात जसं सूर्य… त्याचं तेज फक्त अनुभवण्यासाठी असतं, पाहण्यासाठी… हात लावला, की पोळतो. तसंच काही देवी रूपांचं आहे.
तर मग, हे लक्षात ठेवा —कुलदेवी ही तुमची खरी रक्षणकर्ती आहे.
तीच तुमचं उगमस्थान आहे, तुमचं अंतिम ठिकाणही. ती सत्वगुणी आहे, वात्सल्याने ओतप्रोत आहे. तिच्या उपासनेनं तुमच्या घरात चैतन्य, समाधान, स्थैर्य, यश, संतती, आरोग्य, आणि प्रसन्नता नांदते.ती सर्वात सुरक्षित, सर्वात प्रभावी, आणि सर्वात जवळची आहे.
बाकीचा तांत्रिक मार्ग तो दुर्मिळ लोकांचा, अगदी विशिष्ट मार्ग आहे. तो वाचनासाठी असू शकतो, कुतूहलासाठी असू शकतो… पण कृतीसाठी नव्हे.
शेवटी एवढंच तुम्ही शंभर देवता पुजलीत, तरी जर कुलदेवीला विसरलात, तर मूल जागृत होत नाही.
पण एकदा का कुलदेवी जागृत झाली, की ती तुमच्या संपूर्ण घराला, वंशाला, नातवंडांना देखील उजळवते.
म्हणूनच…कुलदेवीसारखी कुणी नाही…तीच खरी जगदंबा… तीच महाविद्या… तीच भक्तांची आणि उपासकांची पहिली आई!
जय जगदंब जय भवानी!
तुमचीच गुरुमाई




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.