मी देवीची भक्त आहे. पण खरं सांगायचं तर, एक काळ असा होता की मला "अंगात येणारे लोक" अजिबात आवडत नव्हते. त्यांचा चेहरा बघूनच राग यायचा. वाटायचं, ही काय नौटंकी आहे? अंगात देवी येते म्हणतात आणि सगळ्या गावात थयथयाट करत फिरतात. माझ्यासाठी ते केवळ ढोंग वाटायचे. आणि माझ्या मनात एकच विचार ठाण मांडून बसलेला असायचा "माझी आई, तुळजाभवानी, अशी का वागेल? असं नौटंकी का करेल?" मला तो तिचा अपमान वाटायचा.
हे मत इतकं पक्कं झालं होतं की, जेव्हा मी पहिल्यांदा गुरुमाईंचा व्हिडीओ पाहिला, तेव्हा त्या ही मला अशाच लोकांसारख्या वाटल्या. मी लगेचच स्क्रोल केलं. पण गंमत अशी की त्यांच्याच अनेक व्हिडीओ, पुन्हा, पुन्हा, आणि पुन्हा माझ्यासमोर यायला लागल्या. अगदी सहा महिन्यानंतरही. जसं काही त्या व्हिडीओमागे कोणी तरी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं. शेवटी एक दिवस मी एक दोन विडिओ पहिले आणि मग त्यांचा ग्रुप जॉइन केला.
तिथे कळालं की, गुरुमाई अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत, कोणाला घाबरवत नाहीत, उगाच संचाराचा तमाशा करत नाहीत. त्या देवीच्या, गुरूंच्या आणि भौतिक जीवनाशी निगडीत सात्विक आणि शास्त्रोक्त उपाय देतात ज्याला वैज्ञानिक आधार पण असतो. पण एक गोष्ट त्या स्पष्ट सांगतात ज्यांना खरोखरच संचार होतो, त्यांचा अपमान करू नका.
मला गुरुमाईंमुळे, त्यांच्या शब्दांतून, त्यांच्या अनुयायांच्या अनुभवांतून, आणि त्यांच्या कार्यातून कळायला लागलं की देवीची भक्ति करण्यासाठी अंगात वारे किंवा संचार असायची आवश्यकता नसते.
आता काही दिवसांपूर्वी ग्रुपवर नामलेखनाची माहिती मिळाली. अशा भरपूर उपासना आणि उपाय त्या वेबसाइट आणि ग्रुप वर देत असतात. पण मी आजवर कोणतीही उपासना केली नाही. पण त्या दिवशी मी लेख वाचला जगदंब नामलेखन व्रत आणि शक्तियाग यावर. खूप खोल, खूप प्रामाणिक आणि खूप सामर्थ्यशाली शब्द होते. तो लेख वाचता वाचता माझ्या मनात अचानक "जगदंब... जगदंब.. हे शब्द घोळवू लागले. मी लक्ष विचलित करण्यासाठी लेख सोडून रील्स बघितल्या, गाणे ऐकले. पण मनात तो शब्द काही निघायचे नाव घेत नव्हता.
शेवटी मी थकले आणि रात्री झोपताना मनात म्हटले ठीक आहे मी अगदी मनापासून तुला बोलवते आहे आई जर तुला वाटत आहे मी हे व्रत घ्यावे तर मला काही तरी चमत्कार दाखव ज्याने मला विश्वास बसेल. माझ्या तुळजाभवानी वर माझा विश्वास आहेच पण गुरु रेवती माई यांच्यावर मला विश्वास बसत नव्हता आणि त्यांनी दिलेला हा जगदंब मंत्र ही मला काही विशेष वाटत नव्हता. वाटत होते एवढा साधारण मंत्र? या पेक्षा मोठे मोठे संस्कृत श्लोक आणि मंत्र अनुष्ठान करते मी देवीचे त्या पुढे हा जगदंब मंत्र अगदी क्षुल्लक वाटत होता. पण तरी ही डोळे मिटले लांब श्वास घेतला आणि अगदी प्रेमाने आई तुळजा भवानी ला स्मरून मनात म्हटले जगदंब जगदंब जगदंब.. 5-6 मिनिटे तशीच बोलत राहिले..
आणि नंतर तिथेच अंथरूण टाकून झोपले. दिवसभर काम केल्याने थकव्यामुळे लगेच झोप लागली. पण त्याच रात्री एक विलक्षण स्वप्न पडलं...
मी एका गडद जंगलात होते. अंधार इतका होता की श्वास घ्यायलाही भीती वाटावी. सभोवताली झाडांची कुजबुज, कुठूनतरी गुरगुरण्याचा आवाज, असे वाटायचे कोणी तरी मला लपून बघत आहे, हसत आहे आणि माझा पाठलाग करत आहे आणि मी... एकटी. मी पळायचा प्रयत्न करत होते, पण पाय चिखलात रुतलेले. अंगावर काटा आला होता. मी किंचाळायचा प्रयत्न केला, पण आवाजच फुटेना माझ पूर्ण शरीर अगदी बांधल्यासारख झालेल तोंडून आवाज फुटेना ओरडण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. स्वप्नात देखील मी माझे सर्व स्तोत्र, कवच आठवन्याचा प्रयत्न करत होते पण मला काहीच आठवत नव्हते. आता मी काय करू? अचानक मला आठवला तो लेख आणि नकळत माझ्या मनात एक नाम सुरू झाले "जगदंब... जगदंब... जगदंब..."
आणि...पुढच्याच क्षणी, एक शांत, थंडसर हात माझ्या हातात आला.
मी थरथरत होते. त्या हातातून शांती आणि सामर्थ्य एकत्र वाटत होतं.त्या हाताने मला चिखलातून, अंधारातून बाहेर खेचलं.माझ्या आजूबाजूला प्रकाश पसरायला लागला. तेव्हा मी पहिल्यांदाच तिचा चेहरा पाहिला ती माझी आई होती तुळजाभवानी माझी जगदंबा. आता अतिशयोक्ति वाटेल किंवा माझी कल्पना पण जे रूप मी पाहिले ते मी शब्दांत वर्णन नाही करू शकत. ती काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांतून एक सागर उतरला माझ्या मनात त्या क्षणाला मी तिचीच झाले. पुढच्याच क्षणी मी खेचले गेले प्रकाशात आणि त्यानंतर मला जाग आली, तेव्हा सकाळचे ४.१७ वाजले होते. मी पूर्ण घामाघूम झाले होते. मी स्वप्नात होते? पण मला ती अनुभूति जी आई माझ्या जवळ असण्याची झाली ती मनातून जात नव्हती. मी जोरजोरात रडायला लागले. माझ्या आवाजाने घरातले सगळेच उठले. मी त्यांना नाही सांगू शकले म्हटले मला भयानक स्वप्न पडले बस एवधच बोलून गप बसले. आणि त्यांना झोपायला सांगितले. पण आता मला झोप येणार नव्हती मी उठले आणि लिहायला बसले "जगदंब... जगदंब... जगदंब..." पानभर लिहिलं, तरी थांबत नव्हते. माझा हात चालूच होता.मी ठरवलं हेच माझं व्रत. हेच माझं आयुष्य. आणि हीच माझी देवी.
आज मी लिहितेय हा अनुभव,
आजही ती रात्र आठवली की अंगावर शहारा येतो. आणि हृदयात एकच गूंज उमटते "जगदंब... जगदंब..."
आता मी त्या व्रताचा एक भाग आहे. मी दररोज नाव लिहिते. आणि रोज तिच्या अस्तित्वाला अनुभवते. माझं सगळं आयुष्य बदललं. एका अनुभवाने. एका स्वप्नाने. आणि त्या नावाने—जगदंब.
- मेधा पुष्कर मगर
पुणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.