या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही

दशमहाविद्या या खरोखरच गृहस्थ लोकांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहेत का? तर याचे उत्तर आहे नाही. दसमहाविद्या म्हणजे अगदी मूलत: तंत्रशक्ती. लोकांना आता सगळं पटकन हवं असतं यूट्यूबवर एखाद्या मंत्राचा व्हिडीओ बघितला, पुस्तकात काही वाचलं आणि वाटलं की आपणही करू शकतो. पण ज्याला या शक्तींचं खरं स्वरूप समजतं त्याला ठाऊक असतं की या शक्ती “माते” असल्या तरी “दयामयी” स्वरूपात नव्हेत. त्या न्यायीही नाहीत, त्या केवळ शक्ती आहेत जशा विजेचा प्रवाह असतो. विजेला नाही विचार की समोरचा चांगला की वाईट. ती जशी आहे तशी परिणाम करते.

गृहस्थ लोकांनी दशमहाविद्या पूजनात शिरताना हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. कुलदेवी असो, तुळजाभवानी, साप्तशृंगी, रेनुका, महालक्ष्मी या सर्व दयामयी स्वरूपात येतात. त्या आपल्या भक्ताच्या भावनेवर द्रवतात. पण दशमहाविद्या या ज्या तंत्रशक्ती आहेत त्या भावनेवर नव्हे तर शक्तीवर चालतात. ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्यावर खऱ्या अर्थाने गुरुकृपा आहे, त्याचं त्या ऐकतात. गुरु म्हणजे येथे साधा पंडित नव्हे, किंवा फक्त देवमंदिरात पूजा करणारा ब्राह्मण नव्हे. येथे “तांत्रिक गुरु” अपेक्षित आहे जो स्वतः त्या मार्गावर पारंगत आहे, ज्याला मंत्राचा प्राणप्रत्यय आहे, आणि ज्याच्याकडे ते शक्तिसंपन्न हस्तांतर करण्याची क्षमता आहे.

दत्तगुरु, स्वामी समर्थ किंवा श्रीगुरुचरित्रातील गुरु या मार्गाचे आधारस्तंभ असले तरी, तांत्रिक मार्गात प्रत्यक्ष तांत्रिक गुरुंचं अस्तित्व अनिवार्य असतं. कारण ही साधना पंडितांच्या सहाय्याने होत नाही. पंडित फक्त विधी सांगतो, पण तंत्र हे विधीपेक्षा जास्त आहे. ही शक्तीची प्रयोगशाळा आहे. आणि ही प्रयोगशाळा चुकीने हाताळली तर स्फोट नक्कीच होतो.

ज्यांनी या साधना केल्या आहेत त्यांचे अनुभव अनेकदा फार भीषण असतात. काहींना मनावर परिणाम होतो, काहींच्या घरात कलह सुरू होतात, काहींच्या आयुष्यात आर्थिक संकटं येतात. कारण शक्ती हलवली जाते आणि ती नियंत्रणात नसेल तर उलटते. जसं तुम्ही वीजेचा तार हाताने पकडला, तर वीज विचारत नाही की तुम्ही भक्त आहात की चांगले माणूस. ती फक्त झटका देते. पण एखादा प्रशिक्षित इलेक्ट्रिशियन तोच तार हाताळतो तेव्हा काही होत नाही, कारण त्याला नियम कळलेले असतात.

आजकाल अनेक ठिकाणी ‘बगला मुखी दीक्षा’, ‘दशमहाविद्या दीक्षा’, ‘मंत्र दीक्षा’ अगदी सहज वाटल्या जातात. जणू एखादं प्रसाद वाटतोय. पण या मार्गात प्रसाद नव्हे तर प्राणदान दिलं जातं आणि जिथे प्राणांचा प्रश्न असतो तिथे खेळ चालत नाही. खरं ज्ञान असलेला गुरु कधीच गृहस्थांना सहजपणे अशा शक्ती देणार नाही. कारण त्याला ठाऊक असतं की जरा जरी चूक झाली तरी त्या शक्तीचा परिणाम गुरुवरही होतो.

काही लोक म्हणतात की आम्ही ब्राह्मणांकडून याचं अनुष्ठान करून घेतो. प्रश्न असा आहे की जेव्हा तो ब्राह्मण अनुष्ठान करेल, तेव्हा तो संकल्प कोणाच्या नावाने घेईल? तुमच्याच नावाने ना? मग फल तुम्हाला मिळावं म्हणून करेल. पण जर काही दोष बसला, तर तोही तुमच्याच नशिबी येणार. ब्राह्मण तर दक्षिणा घेऊन निघून जातील. पण परिणाम मात्र तुमच्या जीवनात उमटतील.

या सगळ्यात कुणाचाही विरोध नाही. पण विवेक असणं अत्यंत आवश्यक आहे. या शक्तींच्या मार्गात चालायचं ठरवताना स्वतःचा, कुटुंबाचा, घरचा विचार करावा. कारण ही साधना केवळ शक्ती देत नाही, ती परीक्षा घेते आणि अनेकदा फार कठोर परीक्षा घेते. ज्यांच्याकडे स्थिर बुद्धी, गुरुकृपा आणि आत्मबल आहे, त्यांच्यासाठीच हा मार्ग आहे. इतरांनी मात्र भावभक्तीचा, नामस्मरणाचा आणि कुलदेवी-दैवत पूजनाचा सोपा आणि सुरक्षित मार्ग निवडावा.

दशमहाविद्या या भीषण सत्य आहेत त्या साधनेचा खेळ नाहीत. त्या विद्यांचा अर्थच आहे “शक्तीचं तंत्र”. आणि शक्तीला फक्त भाव नाही, तर नियम असतात. म्हणूनच म्हणतात देवीची उपासना करा, पण शक्तीची परीक्षा कधीच घेऊ नका.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

अप्सरा, यक्षिणी आणि योगिनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनेक जण विचारतात की अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी किंवा अशा सूक्ष्म जगातील शक्तींची साधना करता येते का. पुस्तके वाचून, यूट्यूबवरील व्हिडि...